डॉ.सुहास हनुमंतराव मोहरीर, गुंजोटी

श्री सद्गुरू वासुदेवराव लक्ष्मणराव देव उर्फ तात्यासाहेब टेंभुर्णीकर यांनी लिहिलेल्या पोथ्या व प्रवचनाच्या संग्रहास प्रस्तावना लिहिण्याचे भाग्य मला मिळावे, हे माझे पूर्व संचित असावे. मी यथामती ने चार ओळी लिहीण्याचे प्रयत्न करीत आहे.

 श्री सद्गुरुं चा जन्म 1902 साली झाला. ते मूळचे टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना या गावचे रहिवासी होते. त्यांच्या घरी श्री नरसिंह हे जागृत देवस्थान आहे. ते लहानपणापासून स्वभावाने धार्मिक आणि मनमिळावू होते त्यांचा कल शालेय शिक्षणापेक्षा संत महात्म्यांच्या चरित्राचे अध्ययन करणे, धार्मिक उत्सवात हिरीरीने सहभागी होत. प्रवचने, कीर्तने ऐकण्यात ते तल्लीन होत असत. इहलोकीच्या क्षणभंगुर आनंदापेक्षा, पारलौकिक जीवनाचेच त्यांना सदैव आकर्षण वाटत राहिले. सद्गुरूंची असलेली सात्विक वृत्ती, सदाचरण, सदैव सहकार्य आणि ईश्वरचिंतनात त्यांनी आपले आयुष्य वेचले. तात्यांचे आजोबा त्यांना 'घराण्याचा कोहिनूर हिरा आहे' असे म्हणायचे. पुढे तात्यांनी निश्चय करून लौकिक शिक्षणही पूर्ण केले. अगदी कमी काळातच ते सातवी व मॅट्रिक उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झाले. त्यांचे मराठी, संस्कृत, इंग्रजी व उर्दू या चार भाषांवर प्रभुत्व होते. त्यांची कस्टम अधिकारी म्हणून तत्कालीन शासनाने नियुक्ती केली. नोकरीच्या काळात त्यांनी भ्रष्टाचार केला ना कुणा सहकाऱ्याला करू दिला. दरम्यानच्या काळात सौ. सुलोचनाबाई, धावडा तालुका भोकरदन या त्यांच्या जीवनात अर्धांगिनी म्हणून आल्या. त्या सुस्वभावी, सुविद्य व संतुष्ट वृत्तीच्या होत्या. दुधात साखर विरघळावी तद्वतच त्या तात्यांच्या संसारात मिसळून गेल्या होत्या. यथावकाश त्यांना तीन मुले, प्रभाकरराव, दुर्गादासराव, व भास्कर राव व तीन मुली कुसुम, प्रमिला व सुमन या तीन मुली झाल्या. तात्यांच्या आशीर्वादाने सर्व मुला- मुलींचा संसार सुखाने चालला. त्यांची मुले, नातवंडे, पतवंडे उच्चशिक्षित व उत्तम उच्चपदस्थ आहेत. त्यांनी संसार नेटका करत भक्ती मार्ग ही सोडला नाही. वेळोवेळी त्यांची प्रवचने, कीर्तने गावोगावी होत असत. त्यांची अमोघ रसाळ वाणी आणि साध्या भाषेतली संत चरित्रांची प्रवचने ऐकून सर्वजण धन्य होत असत. हैदराबाद स्टेट, मद्रास, मैसूर, बेंगलोर, मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्रात इतरत्रही त्यांच्या प्रवचन कीर्तनाचा जागर चालूच होता. संतांच्या शिकवणीचा ज्ञानयज्ञ तात्यांनी अखंड सुरू ठेवला. निर्मळ, निर्मोही, षट्विकार रहित जीवन जगण्यातली सहजता व पारदर्शकता त्यांच्या चरित्रात दिसून येते. जनमाणसांना सुखी करण्याची तळमळ फक्त संतांनाच असू शकते. बोले तैसा चाले असा सद्गुरु तात्यांचा जीवन प्रवास होता. सहज भाषेतील अर्थपूर्ण प्रवचने, कीर्तने श्रोत्यांत प्रचंड लोकप्रिय होऊ लागली. तात्यांना श्री शंकराचार्यां कडून 'प्रवचन केसरी' ही पदवी लाभली. हैदराबाद संस्थांना कडून कित्येक मानपत्र व पदव्या मिळाल्या. सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा, समाजात समानता रहावी, एकोपा राहावा, अज्ञानी जनांस सन्मार्ग मिळावा, जनमाणसांची दु:खे कमी व्हावीत ह्या ध्येयाने झपाटलेले होते. श्री रंगनाथ महाराज (श्री आत्मानंद सरस्वती महाराज) विश्रांती मठ, नाव्हा हे तात्यांचे गुरू होते. तात्या रंगनाथ महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या शिष्यांनी त्यांना गुरुमंत्र देण्याचा आग्रह केला, तेव्हा तात्या म्हणाले, "गुरु आज्ञेशिवाय हे शक्य नाही, जर गुरूंच्या समाधिस्थानतून एक महिन्याच्या आत औदुंबर उगवल्यास ती गुरु आज्ञा समजून मी गुरुमंत्र देईन" आणि खरोखरच, एक महिन्याच्या आत रंगनाथ स्वामींच्या समाधी च्या फटीतून औदुंबर उगवले. तेव्हापासून तात्यांनी भक्तांना अनुग्रह देण्यास सुरुवात केली. तात्यांचा शिष्यपरिवार सर्वत्र होता. तात्यांचा अंधश्रद्धा व कर्मकांडावर अजिबात विश्वास नव्हता. त्यांना भक्तिमार्गावर व कर्मयोगा वर विश्वास होता. त्यांचे एक शिष्य वै. डॉक्टर यशवंतराव भुसनळे यांनी सद्गुरु तात्यांचे चरित्र लिहिले आहे. ते त्यांच्या चरित्रात म्हणतात 'तुझीया सत्तेने तुझे गुण गाऊ, तेणे सुखी राहू सर्व काळ'. सरोवर, सद्गुरु आणि तरुवर हे केवळ जगाच्या कल्याणासाठी जन्म घेतात, असे म्हंटले जाते, तद्वतच सद्गुरु वासुदेवराव देव यांनी आयुष्यभर ईश्वरचिंतनात राहून तुम्हा -आम्हांचे दुःख दूर करतच आपला देह १९८० साली ठेवला. पंचभौतीक देहाने जरी ते आता आपल्यात नसले, तरीही ते आपल्या आसपासच आहेत. त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठिशी आहेत.

सद्गुरु वासुदेव राव देव यांनी अनेक संतचरीत्रे आपल्या सोप्या आणि रसाळ भाषेत लिहीली आहेत. जालना येथे श्री.भास्कर वासुदेवराव देव यांच्या घरी श्री.सद्गुरू तात्यांच्या पादुका स्थापन केल्या असून दरवर्षी गुरु पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

*हरये नमः*