माझे आजे सासरे श्री. वासुदेव महाराज यांनी लक्ष कोटी नमस्कार
मी १९९९ साली देव कुटूंबाची सुन म्हणुन या कुटुंबात सामील झाले. माहेर सुटल्याची, आईबाबांपासून दुर जाण्याची हुरहूर लागली होती. कन्यादान करून जेंव्हा माझ्या आई बाबांनी माझा हात माझे पती सुधीर यांच्या हातात दिला, त्याक्षणी अचानक मला एक वेगळाच अनुभव आला, तो मला नेमका शब्दात नाही व्यक्त करता येत.
नवीन घरात कसं वागावं, काही हवं असेल तर ते नेमकं कोणाला मागावं हे माहेरच्या मंडळींनी सांगितले होते, परंतु माझ्या मोठ्या ननंद सौ. माधुरी दिवाण ह्या लातुरात रहात असल्याने त्यांची ओळख झाली होती. त्यामुळे फारसं दडपण नव्हते.
लग्नानंतर ची आठ-दहा दिवसांची धावपळ संपल्यावर एक एक करून पाहुणे निरोप घेत होते. घरात सासू, सासरे आणि आम्ही नवरा-बायको असं चौघेजण राहिलो. खरा संसार सुरू झाला म्हणाणा...
त्यावेळी मला पदोपदी जाणवत होते की आपली काळजी करणारे सासु सासरे आणि नवरा हे इतर ऐकून असलेल्या सासर सारखे नाहीत तर त्यांच्या मध्ये एक वेगळीच ममता आहे, अगदी आम्ही रहात असलेल्या कॉलनीच्या नावाप्रमाणेच.
वर्षा मागून वर्षे संपली, संसार वेलीवर हर्ष नावाचं गोंडस फुल फुललं. मला हळू हळू आमच्या घराण्यातील थोर व्यक्तिंचा परिचय होत गेला. टेंभुर्णी च्या उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी एकत्र येण्याची सर्वांची उत्सुकता व तेथे आल्यावर एकमेकांना आराम मिळावा म्हणून, सर्वांनी चढाओढीने न सांगता केलेली कामे... हे सर्व पाहून मी या थोर घराण्याची सुन झाल्याचं समाधान आपोआपच माझ्या आई बाबांना माझ्या चेहऱ्यावर दिसून आले.
मला प्रत्यक्ष आजे
सास-यांचा सहवास लाभला नाही, परंतु त्यांचा आशीर्वाद रुपी हात सदैव माझ्या माथी होता, आहे आणि राहील ही मला खात्री आहे.
त्यांना कोटी कोटी प्रणाम.