वैजयंती सहस्रबुद्धे (राजहंस ताई) जालना

 

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः  

 गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः


गुरु सर्वश्रेष्ठ पदवी आणि सद्गुरु मिळणे हे महत् भाग्य! ते भाग्य मला लाभले, ते सद्गुरु श्री वासुदेवराव देव टेंभुर्णीकर यांचे शिष्यत्व मिळण्याने माझ्या जीवनाचे सार्थक झाले. कसलीही अपेक्षा नसलेले निस्वार्थ , शांत , प्रेमळ  विशेष म्हणजे आपल्या अस्तित्वाचे कोणतेही अवडंबर न करणारे असे माझे सद्गुरू महाराज यांच्या चरणी माझे त्रिवार वंदन .

त्यांचा सहवास मला त्यामानाने फार थोडा मिळाला पण जो मिळाला त्याने मी धन्य झाले . आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना अतिशय महत्त्व आहे कारण गुरु सद्गुरु अध्यात्म विद्येचे ज्ञान शिष्यांना देत असतात .

संसारात राहून अध्यात्मविद्या कशी मिळवावी हे त्यांनी स्वतःच्याच उदाहरणावरुन शिकवले. या अशाश्‍वत प्रपंचात राहून  मायेचा विळखा कसा सोडवावा आणि परमेश्वराच्या जवळ कसे राहावे हे त्यांच्याकडून कळाले. शास्त्र प्रचिती, गुरू प्रचिती आणि आत्म प्रचिती अशा त्यांनी दिलेल्या ज्ञानामुळेच  कळाली. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याकरिता त्यांचेच नाव घ्यावे लागेल. अगदी निस्पृह, निरपेक्ष, अहंपणाचा अभाव, प्रसिद्धीपरान्मुख, शिष्याविषयी कळकळ, प्रेम त्यांच्या ठायी एकवटले होते. त्यांच्या देवाज्ञेमुळे मला पोरके झाल्यासारखे झाले . एक आधार जाऊन आपण निराधार झाल्याचे वाटू लागले पण संकट काळी काही अवघड प्रसंगी त्यांचाच मानसिक आधार वाटतो. अशा वेळी गुरु माऊलींची आठवण येते. माझ्या प्रश्नांचे ओझे त्यांच्यावर सोपवून गुरुमाऊली मला सद्बुद्धी देतील याची खात्री वाटते आणि वेळोवेळीअनुभव पण तसेच आले आणि वेळप्रसंगी त्यांनीच तारले आहे. त्यांना साष्टांग दंडवत करून मी थांबते .